Tuesday, November 3, 2015

खुर्ची आणि स्टूल

देवाची सही

पंढरपूरची शाळा

शिक्षणाचे (बिघडलेले) आरोग्य
शिक्षणाचे (बिघडलेले) आरोग्य


     शिक्षणाचं आरोग्य बिघडायला मुख्य कारण घडलं ते “शिक्षण डॉक्टरांचं” चुकलेलं निदान आणि त्यावर दिलेला जालीम डोस! हे वाचताना तुम्हाला त्रास होत असेल पण मी तुम्हाला (तुम्हालाच माहित असलेल्या) चार प्राथमिक गोष्टी सांगतो.

गोष्ट एक. कोणे एके काळी काही ‘शिडॉ’ (शिक्षण डॉक्टर) ना असा शोध लागला की,‘लहान मूल हा मातीचा गोळा आहे. शिक्षक त्याला घडवतात आणि मगच त्याचे माणसात रुपांतर होते.” जणूकाही हे वेदा मधीलंच अपौरुषेय वाक्य आहे असा समाजाचा ठाम समज झाला. हा (गैर) समज खूप खोलवर रुजला मग चांगलाच फोफावला आणि इथेच मोठा लोचा झाला. घरात मातीचे गोळे जन्माला आले की त्यांचं शिकण्यासाठी शिक्षक नावाच्या शिल्पकाराकडे आउटसोर्सींग केलं जायचं. हे महान शिल्पकार हातात छिन्नी हातोडी घेऊन तयारीतच असत.
“उत्तम शिल्प घडण्यासाठी त्या ‘गोळ्याने’ टाकीचे भक्कम घाव, हजारो फटके, अनंत यातना आणि शिल्पकाराची बोलणी, दूषणं, लाथा हे सारं (आनंदाने व विनातक्रार) स्वीकारले पाहिजे” असा ही एक उपसमज होता. (संदर्भासाठी वाचा, बिगरी ते म्याट्रीक, पु.ल.देशपांडे) शिक्षकांनी मुलांना मारणे, झोडपणे, कुटणे, फटकावणे, बुकलणे, कानफटवणे, नवनवीन युक्त्या वापरुन त्याला यातना देणे या मामुली गोष्टी समजल्या जायच्या. यासाठी शिल्पकार शिक्षक पट्टी, छडी, डस्टर, झाडाचा फोक, काठी अशा शैक्षणिक साधनांची मदत घेत. काहीवेळा या शैक्षणिक साधनांवर अवलंबून न राहता शिक्षक आपल्या बळकट हाता-पायांवर विश्वास ठेवत.
अशाप्रकारे  शिल्प घडायला सुरुवात झाली की ते शिक्षक “त्या अनघड शिल्पांना” इतकं शिकवत-इतकं शिकवत की त्या (उच्च) शिक्षणानेच मुले गुदमरुन जात. समजून न घेता सतत घोकंपट्टी केल्याने मुलांना शिक्षणाचे अपचन तरी होई नाहीतर डिसेंट्री. आणि मग परीक्षेत पेपरात वर्षभराचा तुंबलेला कोठा साफ केला की मुले पुढच्या वर्गात जात.

गोष्ट दोन. “ज्या वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स आहे तो वर्ग चांगला” असे आणखी एक अपौरुषेय वाक्य रुजलं होतं. ‘वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स’ याचा अर्थ, शिक्षक भडाभडा आणि भसाभस शिकवत आहेत. समोरील मुले मात्र ‘आमच्याच नशीबी हे का आले आहेत?’ याचा विचार करत चेहर्‍यावर आदर ठेवून शांत बसली आहेत. वर्गातील सायलेन्स बीघडू नये म्हणून मुलांनी समोरील शिक्षक जे सांगत आहेत ते फक्त ऐकायचं..बस्स.

गोष्ट तीन. “शिक्षकांना प्रश्न विचारणे, तुम्ही शिकविलेले मला कळले नाही असे मुलाने म्हणणे” हा दखलपात्र गुन्हा होता. मुलाने चुकून शिक्षकांना प्रश्न विचारलाच तर त्या प्रश्नाचे उत्तर मुलाला त्याच्या गालावर, हातावर, पाठीवर किंवा पायावर चांगले सणसणीतपणे मिळत असे. पुढचे दोन दिवस तरी या “उत्तराच्या खाणाखुणा” त्याच्या अंगावर वाचता येत असत. यासंदर्भात “गप्प बस. चूप बस. उगाच प्रश्न विचारण्याचा आगाऊपणा करू नकोस. आला मोठा मला अक्कल शिकवायला. उगाच का माझे काळ्याचे पांढरे झाले?” ही ब्रॅण्डेड वाक्ये मुलांना ऐकावी लागत.

गोष्ट चवथी आणि शेवटची. सर्व शिल्पकार शिक्षकांचा असा दृढ विश्वास होता की “त्यांना शिकविता येते. ते शिकवतात म्हणूनच मुले घडतात.” आणि शिकवणे म्हणजेच पाठ्यपुस्तक पूर्ण करणे.

..................................................................................................


आता या वरील चार गोष्टींवर मी काहीच भाष्य करत नाही.
विनोबांनी त्यांच्या ‘शिक्षण विचार’ या पुस्तकात काय सांगितले आहे ते त्यांच्याच शब्दात फक्त तुम्हाला सांगतो.
·       एका शब्दाच्या शोधावरुन सर्व हिंदुस्थानच्या मनोवृत्तीचे भान होते. आपल्या घटनेत ज्या चौदा भाषांचा उल्लेख आहे, त्या सर्व भाषेत ‘शिकविणे’ यासाठी शब्द नाही. ‘शिकण्या’- साठीच शब्द आहे. शिकविणे म्हणजे शिकण्याला मदत करणे असा कृत्रीम शब्द बनविला आहे. इंग्रजीत जसा ‘टीच’ (शिकविणे) शब्द आहे तसा आमच्या भाषेत नाही. आम्ही शिकवतो,शिकवण्याला मदत करतो, पण ‘टीच’ करत नाही. इंग्रजीत एक शब्द ‘लर्न’ (शिकणे) आहे व दुसरा ‘टीच’ (शिकविणे) आहे. म्हणजे शिकणे ही स्वतंत्र क्रिया असून शिकविणे ही हि स्वतंत्र क्रिया आहे. हा अध्यापकाचा अहंकार आहे. हा अहंकार जोपर्यंत आम्ही राखू तोपर्यंत शिक्षणाचे तत्व आमच्या लक्षात येणार नाही. म्हणूण पहिली गोष्ट आपण ही समजली पाहिजे की, दुनियेत अशिक्षित म्हणून कोणी नाही.
·       शिक्षक आणि मुले दोघेंही एकमेकांच्या आचरणापासून शिकत असतात. दोघेही विद्यार्थीच आहेत. जे दिले जात नाही ते शिक्षण. जे घेतले जाते, ज्याचा हिशोब ठेवला जाऊ शकतो किंवा ज्याची काही नोंद ठेवली जाऊ शकते, ते शिक्षण नाही. शिक्षणाची मोजदाद करता येत नाही. जीवनच शिक्षण आहे. कॅलरींचा खरा हिशोब कागदावर नव्हे तर शरीरावरच दिसून येतो. जे अनुभवले, खाल्ले, पचले, रक्तात मुरले तेच शिक्षण.
·       ज्या विषयची मला परीक्षा द्यावी लागली त्या विषयांचे मला फारसे ज्ञान नाही. परंतु ज्यांची परीक्षी मी दिली नाही त्यांचे मला चांगले ज्ञान आहे. म्हणून माझ्या अनुभवाने मी परीक्षेला काही किंमत देत नाही. पोट साफ करण्याकरता रेचक घ्यावे तशा ह्या परीक्षा असतात. परीक्षा दिल्या की सर्व ज्ञान साफ! म्हणून शिक्षण-शास्र्यांनी उभ्या केलेल्या या ढोंगात पडण्याची जरुरी नाही.
·       पुस्तकात अक्षरे असतात. त्यामुळे पुस्तकांच्या संगतीने जीवन सार्थक करण्याची आशा व्यर्थ आहे. “बोलाचीच कढी बोलाचाचि भात, जेवूनिया तृप्त कोण झाला?” हा सवाल मार्मिक आहे. कवीने म्हंटल्याप्रमाणे बुकातली विहीर बुडवीत ही नाही आणि बुकातली होडी तारीतहि नाही. ‘अश्व’ म्हणजे ‘घोडा’ असे कोशात लिहिलेले असते. मुलांना वाटते, ‘अश्व’ शब्दाचा अर्थ कोशात दिलेला आहे. पण ते खरे नव्हे. अश्व शब्दाचा अर्थ कोशाच्या बाहेर तबेल्यात बांधून ठेवला आहे. तो कोशात मावणे शक्य नाही. ‘अश्व’ म्हणजे ‘घोडा’ हे कोशातले वाक्य इतकेच सांगते, “अश्व शब्दाचा तोच अर्थ आहे जो घोडा शब्दाचा अर्थ आहे.” तो कोणता? तबेल्यात जाऊन पाहा. कोशात नुसता पर्यायी शब्द दिलेला असतो. पुस्तकात अर्थ राहत नाही. अर्थ सृष्टीत राहतो. हे जेव्हा उमजेल तेव्हा खर्‍या ज्ञानाची चव कळेल.
·       एका प्राचीन वचनात असे सांगितले आहे की, प्रसंगी ज्याचा सल्ला आपण घेऊ शकू असा सर्वात जवळचा माणूस म्हणजे गुरू. जीवनात कधी एखादी समस्या उद्भवली, कठीण प्रश् समोर उभा राहिला, तर सल्ला कोणाचा घ्यावा? शास्त्रकारांनी सांगितले आहे की तटस्थ गुरुजनांचा घ्यावा. आज आपली स्थिती काय आहे? दरवर्षी आपल्या हातात कमीतकमी पंचवीस-तीस विद्यार्थी असतात. संपूर्ण नोकरी काळात या हिशोबाने हजारो विद्यार्थी आपल्या हातातून पार होतात. आपण त्यांना शिक्षण दिले, संस्कार दिले यात शंका नाही. परंतु त्यातले किती विद्यार्थी त्यांच्या जीवनातील समस्या घेऊन तुमचा सल्ला मागण्यासाठी आले? ते आईचा सल्ला घेतात, वडिलांचा घेतात, पत्नीचा किंवा पतीचा सल्ला घेतात. भावाचा, मित्राचा सल्ला घेतात; परंतु शिक्षकाला मात्र दूर ठेवतात. हा, शिक्षक म्हणून आपला केव्हढा मोठा पराभव आहे! वास्तविक शिक्षकाचा सल्ला हा सर्वात श्रेष्ठ सल्ला मानला गेला पाहिजे. परंतु आज ती स्थिती नाही. याचे कारण एकच आणि ते म्हणजे आज शिक्षकाला सामान्य नोकरापेक्षा वेगळे स्थान नाही. आपण जर संकुचित राजकारणाच्या वर उठाल आणि जागतिक राजकारणाचा अभ्यास कराल, तिकडे लक्ष द्याल तर आपला अधिकार आपोआप वर उंचावेल. याचा परीणाम म्हणून ठिकठिकाणचे लोक आपला सल्ला घेण्यासाठी धावत येतील.
·       मला जर कोणी विचारले की, मुलांच्या शिक्षणाचे तत्व काय? तर थोडक्यात मी सांगेन की, शिक्षण देणार्‍या शिक्षकांनी बाल व्हायचे आणि शिक्षण घेणार्‍या बालकांनी मोठे व्हायचे. शिक्षक जर बाल होऊ शकत नसेल तर तो शिक्षण देत नाही, आणि बाल जर मोठा होऊ शकत नसेल तर तो शिक्षण घेत नाही असे समजले पाहिजे.
.............................................................................................

आता तुम्हीच ठरवा की सध्या शिक्षक आपला मोठेपणा बाजूला ठेवून मुलांसोबत शिकत आहेत की शिक्षण ‘देत’ आहेत? एकंदर शिक्षण आजारी आहे की व्हेंटिलेटरवर आहे?
मला कळवाल. मी ‘तुमच्या’ शिक्षण-विचार पत्रांची वाट पाहतोय.

.............................................................................................

·      राजीव तांबे.
rajcopper@gmail.com

Sunday, June 21, 2015

प्रेम की मैत्री?दोन खिडक्या

प्रेम की मैत्री?
पहिली खिडकी :बाबा :
काय रे अभ्यास करतोयस की पेंगतोयस?
मोहित :
का कुणास ठाऊक कंटाळा आलाय..
बाबा :
तुला कधी कंटाळा आलेला नसतो?
जेव्हा बघावं तेव्हा तुझा टाइमपास चालू असतो.
मोहित :
असं काय म्हणता बाबा? मी करतो अभ्यास
बाबा :
तू अभ्यास करतोस तर मग तुझे मार्क घसरत का चालले आहेत?
म्हणजे तुझं अभ्यासात लक्ष नाही. काहीतरी गडबड आहे.
मोहित :
तसं काही नाही..
बाबा :
मग कसं आहे? तुला काय वाटतं, मला काही कळत नाही?
मोहित :
नाही बाबा. मी रोज अभ्यासाला वेळेवर बसतो. संध्याकाळी क्लासला पण जातो.
बाबा :
खरंसांग तू रोज क्लासला जातोस?
मोहित :
अं..हो. मी क्लास तर कधीच चुकवत नाही.
बाबा :
परवा क्लासला गेला होतास?
मोहित :
अं.. परवा गेलो नव्हतो. पण मी आईला सांगितलं होतं.
बाबा :
अच्छा. म.. मला सांग, क्लासला न जाता तू संध्यकाळी कुठे भटकायला गेला होतास?
तुला काय वाटतं, तू बाहेर काय उद्योग करतोस ते आम्हाला समजत नाही?
मोहित :
मी नव्हतो कुठे भटकायला गेलो..
बाबा :
मोहित खोटं बोलू नकोस, बर्‍याबोलाने खरं सांग.
माझ्या मित्राने तुला क्लाससमोरच्या बंद दुकानाजवळ उभं असलेलं पाहिलं आहे. 
तुझ्यासोबत आणखीपण कुणी तरी होतं, पण त्याला अंधारामुळे नीटसं दिसलं नाही.
मोहित :
हां आठवलं. मी बरं नसल्याने क्लासला गेलो नव्हतो. पण क्लासचा बुडालेला 
अभ्यास भरुन काढण्यासाठी मी क्लास सुटायच्यावेळी मित्रांना भेटायला तिथे गेलो होतो.
बाबा :
म..अभ्यास भरून काढला का..?
मोहित :
अं नाही.. म्हणजे काढतोय..
बाबा :
त्यादिवशी कोण मित्र भेटले तुला..?
मोहित :
अं..अं..मित्र.. तो माझा खास मित्र..
बाबा :
मित्र की मैत्रिण?
मोहित :
अं.. म्हणजे..?
बाबा :
उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस.
मला काय म्हणायचं आहे ते तुला बरोबर कळलं आहे.
मोहित :
अं.. त्यादिवशी मला मित्रच भेटला होता. त्याच्या कडून..
बाबा :
मोहित माझ्याशी खोटं बोलू नकोस. मी उठलो तर तुझ्या कानाखाली जाळ काढीन.
पुन्हा विचारतो, तू तिथे कुणाशी बोलत उभा होतास?
मोहित :
(भीतीने थरथरत) अं.. म्हणजे आमच्याच क्लास मधली.. 
म्हणजे आमच्याच ग्रुप मधली मैत्रिण.. म्हणजे ती आमची मित्रच आहे.. 
ती भेटली होती.
बाबा :
(रागाने चिडून) मित्र भेटला होता की मैत्रीण भेटली होती?
मोहित :
अं..मैत्रीण.. म्हणजे..
बाबा :
एक शब्द पुढे बोलू नकोस.
माझ्या मित्राने तुझे सगळे धंदे बघितलेत..
मोहित :
पण बाबा..
बाबा :
गप बैस. तू तिच्याशी बोलत होतास ना..?
मोहित :
हो.
बाबा :
तू तिच्याकडून काहीतरी घेतलंस ना?
मोहित :
हो. वही घेतली.
बाबा :
का.. तिला का भेटलास तू..? तिच्याच कडून का वही घेतलीस?
मोहित :
अं.. म्हणजे..
बाबा :
का..? बाकी तुझे सगळे मित्र मेले वाटतं?
तुला वही द्यायला तीच एकटी जीवंत राहिली?
तुला काय वाटतं, याचा अर्थ मला समजत नाही?
मोहित :
(थरथरत) पण बाबा आमचं असं काही नाहीए.
बाबा :
व्वा! आता तू मला अक्कल शिकवायला लागलास?
त्या मुलीला पुन्हा तू भेटल्याचं किंवा बोलल्याचं जर मला कळलं तर
 तुझी तंगडीच मोडून टाकीन.
एक सांगून ठेवतो..
मोहित :
(भीतीने गडबडून) बाबा..बाबा.. माझं ऐकता का..? ती आमच्या ग्रुप मधे आहे..
बाबा :
तुला तिच्याशी बोलायचंच आहे.. हो..ना..?
मोहित :
(थरथरत) अं..हो.. म्हणजे अभ्यासाचं बोलायचं..
बाबा :
मोहित इतकं सांगून ही तू माझं ऐकत नाहीस? तुला फटकावल्याशिवाय 
तू सुधारणार नाहीस. आज मी तयारीतच आहे.
मोहित :
(कळवळून) बाबा मला मारू नका प्लीज.. मी तुमचं ऐकीन.


.......................................................................................................................................दुसरी खिडकी :बाबा :
काय रे अभ्यास करतोयस की पेंगतोयस?
मोहित :
अभ्यास करताना मधेच कंटाळा येतो. लक्ष लागत नाही.
बाबा :
कुठला अभ्यास? शाळेचा की क्लासचा?
मोहित :
इन जनरल अभ्यास करतानाच.
बाबा :
का बरं?
मोहित :
(काहीच बोलत नाही)
बाबा :
क्लासला नियमित जातोस ना?
मोहित :
हो तर.. क्लास मी कधीच चुकवत नाही.
बाबा :
गुड. मला सांग, तू परवा क्लासला गेला होतास का?
मोहित :
अं.. नाही.
बाबा :
का? आणि मला पण काही बोलला नाहीस?
मोहित :
मी आईला सांगितलं होतं. मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी घरीच होतो.
बाबा :
पूर्णवेळ घरीच होतास की कुठे बाहेर पण गेला होतास?
मोहित :
अं हो विसरलोच.. मी..
बाबा :
मोहित, एक खोटं बोललं तर ते लपवण्यासाठी आणखी एक बोलावं लागतं 
आणि ही मालिका संपतच नाही.
मोहित :
पण मी..
बाबा :
मोहित तुला माहित्यै, मला खोटं बोलण्याची चीड आहे. आणि
 मुख्य म्हणजे आपण घरात एकमेकांशी खरंच बोलतो किनई?
मोहित :
हो
बाबा :
म.. तू अशी शब्दांची फिरवाफिरवी का करतो आहेस? बोलताना का असा गोंधळला आहेस? तुला जे सांगायचं आहे ते मोकळेपणाने सांग.
मोहित :
क्लास सुटायच्यावेळी मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो..
बाबा :
मित्राला की मैत्रिणीला..? नक्की कुणाला?
मोहित :
अं.. (काहीच बोलत नाही)
बाबा :
माझ्या मित्राने तुला आणि तुझ्या मैत्रिणीला क्लास समोरच्या बंद दुकाना समोर उभं असलेलं पाहिलं. मग त्याने मला लगेच फोन केला आणि म्हणाला,
‘जा आत्ताच्या आत्ता आणि खडसाव त्याला.’
पण मी तसं काही केलं नाही. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मोहित :
अं हो.
बाबा :
म्हणजे? तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस.
मोहित :
अं हो. मला भीती वाटली, तुम्हाला खरं-खरं सांगायला.
बाबा :
पण का? खरं बोललं तर मला राग येत नाही.
आणि खोटं बोललं तर..
मोहित :
(घाबरुन) तर..
बाबा :
असं काय करतोस? तुला माहित आहे, खोटं बोललं तरी मी समोरच्याला 
पुन्हा-पुन्हा खरं बोलालयची संधी देतो. देतो किनई?
मोहित :
हो बाबा.
बाबा :
म.. सांग मला. न घाबरता सांग.
मोहित :
मी परवा क्लासला गेलो नव्हतो. पण क्लास सुटायच्या वेळी मी नेहाला 
भेटायला गेलो होतो. तिच्याकडून मला अभ्यासाची वही घ्यायची होती. 
नेहा आमच्या ग्रुप मधेच आहे.
बाबा :
आणखी काही..
मोहित :
अं.. सांगितल्यावर तुम्ही रागावणार नाही ना..?
बाबा :
मोकळेपणाने बोललास तर मला कळेल ना?
मोहित :
बाबा.. अं.. नेहा मला खूप आवडते. त्यामुळे माझं कधी-कधी अभ्यासात लक्ष 
लागत नाही. मला माहित्यै माझं काहीतरी चुकतंय.
बाबा :
तुला कोण म्हणालं, तुझ काही चुकतंय म्हणून?
मोहित :
म्हणजे..? मला नाही कळलं?
बाबा :
मोहित तू आता नववीत आहेस. या वयात एखाद्या मुलीविषयी आकर्षण वाटणं 
काही गैर नाही. तिच्याशी बोलावंस वाटणं यात ही गैर काही नाही. पण..
मोहित :
पण काय..?
बाबा :
पण त्याचा आपल्या अभ्यासावर परिणाम होणं हे मात्र योग्य नाही.
मोहित :
अं हो..हो. पण मी आता काय करू?
बाबा :
तुला अभ्यास महत्वाचा आहे कि नेहाची मैत्री? तू प्राथमिकता ठरव. 
अभ्यास करताना जर मनात नेहाचे विचार आले तर त्यावेळी मनाला बजाव, 
की ‘आत्ता मला फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायचा आहे. 
 प्लीज इतर गोष्टी नंतर.’
मोहित :
पण असं सांगून होईल?
बाबा :
का नाही होणार? थोड्याशा सरावाने तर होईल पण तुझी तीव्र इच्छा असेल तर लगेच होईल. करुन तर पाहा.
मोहित :
प्रयत्न करतो.
बाबा :
गुड. ‘एखादी गोष्ट नको’ असं म्हंटलं तर ती पुन्हा कराविशी वाटते 
पण ‘तीच गोष्ट मग करुया’ असं म्हंटलं तर, तो विचार बाजूला पडतो.
मोहित :
बाबा आता माझ्या अभ्यासाची तक्रार तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही..
बाबा :
आणि मैत्रीची पण..
मोहित :
हो तर! नक्कीच. बाबा खरंच तुम्ही खूप चांगले आहात.-    राजीव तांबे
rajcopper91@gmail.com