Sunday, September 18, 2011

शिकवणं : खूप-खूप आणि चांगलं.

शिकवणं : खूप-खूप आणि चांगलं.

परवा एक शिक्षक भेटले. ते म्हणाले, मुलांना खूप चांगलं शिकवायला मला आवडतं. मग थोड्यावेळाने म्हणाले, मला खूप शिकवायला आवडतं.

आता माझा जरा गोंधळ झाला. मी त्यांना या दोनमधला फरक विचारला.

तर ते वैतागून म्हणाले, आता एकदा याबाबत आपण सविस्तरच बोलू. आणि गेले निघून.

नाशिकच्या आनंदनिकेतन शाळेतील मुलांशी गप्पा मारायला गेलो होतो. मुले होती इयत्ता ७वी.

मग हे दोन प्रश्न मुलांनाच विचारले :

१. खूप-खूप शिकवणं म्हणजे काय?

२. चांगलं शिकवणं म्हणजे काय?

मुलांनी भन्नाट उत्तरं दिली. दीपाताईंनी ती पटापट लिहून घेतली. मला आता त्यातली काही आठवत आहेत ती तुमच्या बरोबर शेअर करतो.

१. खूप-खूप शिकवणं म्हणजे : लई बोअर करणं, जाम पकवणं, इतकं शिकवणं-इतकं शिकवणं की नंतर काहीच लक्षात न राहाणं, मुलांना शिक्षा करत शिकवणं, मुलांना समजून न घेता शिकवणं, मुलांची जराशी चूक झाली तरी त्याला भरमसाठ शिक्षा करत पुन्हा तेच शिकवणं.

२. चांगलं शिकवणं म्हणजे : थोडक्यात शिकवणं, शिक्षा न करता शिकवणं, योग्य उत्तर मुलांच्या डोक्यावर न आदळता ते मुलांकडूनच गप्पा मारत काढून घेणं, शिकवताना जोक सांगणं, मुलांना समजलेली गोष्ट पुन्हा-पुन्हा न सांगणं आणि सारखे प्रश्न न विचारता मुलांना पण प्रश्न विचारायला देणं.


तुम्हाला काय वाटतं: खूप खूप शिकवायचं?

चांगलं शिकवायचं?

खूप चांगलं शिकवायचं?

चांगलं खूप शिकवायचं?

पुढच्यावेळी पाहूया, खरंच शिकवता येतं का?

आपण संपर्कात राहूया.

Saturday, September 17, 2011

बाहुली कुणासाठी ?

काल खूप दिवसांनी खेळण्यांच्या दुकानात गेलो होतो.
रविवारी बालवाडितल्या पालकांसाठी कार्यशाळा आहे, म्हणूण काही खेळणी मला घ्यायची होती.
त्याठिकाणीच भेटली सलोनी.
सलोनीला बाहुली घ्यायची होती पण कुठली बाहुली घ्यावी हे काही तिला कळत नव्हतं.तिला एकावेळी सगळ्याच बाहुल्या आवडायच्या तर दुसर्‍यावेळी कुठल्याच नाहीत.
त्यामुळे सहाजजिकच तिच्या आईची सहनशक्ती संपू लागली. आता घे कुठलीतरी बाहुली आणि चल असं म्हणू लागली.
आईने सलोनीशी खूप घासाघीस केल्यावर, शेवटी तीन पैकी एक बाहुली घ्यायचं ठरलं.
पण कुठली? हे काही ठरेना.
लहान मुलीवर संतापणारी आई पाहिल्याने, मी या प्रकरणात मधे पडायचं ठरवलं.
मी सलोनीला म्हणालो,आपण एक आयडिया करुया.या तिनही बाहुल्यांना तू विचार की आमच्या घरी येणार का?
जी बाहुली हो म्हणेल तिला घरी घेऊन जा.
सलोनीने तीघींना विचारलं. त्यातली गुलाबी बाहुली चटकन हो म्हणाली.सलोनीने लगेच तिला उचलून घेतलं.छातीशी घट्टं धरलं.
पण ही गुलाबी बाहुली, तिच्या आईला काही फार आवडली नव्हती.तिच्या आईचा जीव तर निळ्या बाहुलीत गुंतला होता.आई काही निळ्या बाहुलीचा हट्ट सोडायला तयार नाही. आणि सलोनी ती गुलाबी बाहुली खाली ठेवायला तयार नाही.
मग शेवटि तिच्या आईला विनंती केली की, तुम्हाला हर ही बाहुली इतकीच आवडली असेल तर ती तुमच्यासाठी घ्या नां! पण मुलांना आपल्याला आवडतील तीच खेळणी घेऊ दे की.
हे ऐकताच त्या माऊलीने माझ्याकडे रागारागात पाहिलं.ती निळी बाहुली दूर ढकलंत ती बाजूला झाली.
खरं सांगा.. ..
यात माझं काही चुकलं असं वाटतंय का तुम्हाला?