Sunday, June 21, 2015

प्रेम की मैत्री?



दोन खिडक्या

प्रेम की मैत्री?
पहिली खिडकी :



बाबा :
काय रे अभ्यास करतोयस की पेंगतोयस?
मोहित :
का कुणास ठाऊक कंटाळा आलाय..
बाबा :
तुला कधी कंटाळा आलेला नसतो?
जेव्हा बघावं तेव्हा तुझा टाइमपास चालू असतो.
मोहित :
असं काय म्हणता बाबा? मी करतो अभ्यास
बाबा :
तू अभ्यास करतोस तर मग तुझे मार्क घसरत का चालले आहेत?
म्हणजे तुझं अभ्यासात लक्ष नाही. काहीतरी गडबड आहे.
मोहित :
तसं काही नाही..
बाबा :
मग कसं आहे? तुला काय वाटतं, मला काही कळत नाही?
मोहित :
नाही बाबा. मी रोज अभ्यासाला वेळेवर बसतो. संध्याकाळी क्लासला पण जातो.
बाबा :
खरंसांग तू रोज क्लासला जातोस?
मोहित :
अं..हो. मी क्लास तर कधीच चुकवत नाही.
बाबा :
परवा क्लासला गेला होतास?
मोहित :
अं.. परवा गेलो नव्हतो. पण मी आईला सांगितलं होतं.
बाबा :
अच्छा. म.. मला सांग, क्लासला न जाता तू संध्यकाळी कुठे भटकायला गेला होतास?
तुला काय वाटतं, तू बाहेर काय उद्योग करतोस ते आम्हाला समजत नाही?
मोहित :
मी नव्हतो कुठे भटकायला गेलो..
बाबा :
मोहित खोटं बोलू नकोस, बर्‍याबोलाने खरं सांग.
माझ्या मित्राने तुला क्लाससमोरच्या बंद दुकानाजवळ उभं असलेलं पाहिलं आहे. 
तुझ्यासोबत आणखीपण कुणी तरी होतं, पण त्याला अंधारामुळे नीटसं दिसलं नाही.
मोहित :
हां आठवलं. मी बरं नसल्याने क्लासला गेलो नव्हतो. पण क्लासचा बुडालेला 
अभ्यास भरुन काढण्यासाठी मी क्लास सुटायच्यावेळी मित्रांना भेटायला तिथे गेलो होतो.
बाबा :
म..अभ्यास भरून काढला का..?
मोहित :
अं नाही.. म्हणजे काढतोय..
बाबा :
त्यादिवशी कोण मित्र भेटले तुला..?
मोहित :
अं..अं..मित्र.. तो माझा खास मित्र..
बाबा :
मित्र की मैत्रिण?
मोहित :
अं.. म्हणजे..?
बाबा :
उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस.
मला काय म्हणायचं आहे ते तुला बरोबर कळलं आहे.
मोहित :
अं.. त्यादिवशी मला मित्रच भेटला होता. त्याच्या कडून..
बाबा :
मोहित माझ्याशी खोटं बोलू नकोस. मी उठलो तर तुझ्या कानाखाली जाळ काढीन.
पुन्हा विचारतो, तू तिथे कुणाशी बोलत उभा होतास?
मोहित :
(भीतीने थरथरत) अं.. म्हणजे आमच्याच क्लास मधली.. 
म्हणजे आमच्याच ग्रुप मधली मैत्रिण.. म्हणजे ती आमची मित्रच आहे.. 
ती भेटली होती.
बाबा :
(रागाने चिडून) मित्र भेटला होता की मैत्रीण भेटली होती?
मोहित :
अं..मैत्रीण.. म्हणजे..
बाबा :
एक शब्द पुढे बोलू नकोस.
माझ्या मित्राने तुझे सगळे धंदे बघितलेत..
मोहित :
पण बाबा..
बाबा :
गप बैस. तू तिच्याशी बोलत होतास ना..?
मोहित :
हो.
बाबा :
तू तिच्याकडून काहीतरी घेतलंस ना?
मोहित :
हो. वही घेतली.
बाबा :
का.. तिला का भेटलास तू..? तिच्याच कडून का वही घेतलीस?
मोहित :
अं.. म्हणजे..
बाबा :
का..? बाकी तुझे सगळे मित्र मेले वाटतं?
तुला वही द्यायला तीच एकटी जीवंत राहिली?
तुला काय वाटतं, याचा अर्थ मला समजत नाही?
मोहित :
(थरथरत) पण बाबा आमचं असं काही नाहीए.
बाबा :
व्वा! आता तू मला अक्कल शिकवायला लागलास?
त्या मुलीला पुन्हा तू भेटल्याचं किंवा बोलल्याचं जर मला कळलं तर
 तुझी तंगडीच मोडून टाकीन.
एक सांगून ठेवतो..
मोहित :
(भीतीने गडबडून) बाबा..बाबा.. माझं ऐकता का..? ती आमच्या ग्रुप मधे आहे..
बाबा :
तुला तिच्याशी बोलायचंच आहे.. हो..ना..?
मोहित :
(थरथरत) अं..हो.. म्हणजे अभ्यासाचं बोलायचं..
बाबा :
मोहित इतकं सांगून ही तू माझं ऐकत नाहीस? तुला फटकावल्याशिवाय 
तू सुधारणार नाहीस. आज मी तयारीतच आहे.
मोहित :
(कळवळून) बाबा मला मारू नका प्लीज.. मी तुमचं ऐकीन.


.......................................................................................................................................



दुसरी खिडकी :



बाबा :
काय रे अभ्यास करतोयस की पेंगतोयस?
मोहित :
अभ्यास करताना मधेच कंटाळा येतो. लक्ष लागत नाही.
बाबा :
कुठला अभ्यास? शाळेचा की क्लासचा?
मोहित :
इन जनरल अभ्यास करतानाच.
बाबा :
का बरं?
मोहित :
(काहीच बोलत नाही)
बाबा :
क्लासला नियमित जातोस ना?
मोहित :
हो तर.. क्लास मी कधीच चुकवत नाही.
बाबा :
गुड. मला सांग, तू परवा क्लासला गेला होतास का?
मोहित :
अं.. नाही.
बाबा :
का? आणि मला पण काही बोलला नाहीस?
मोहित :
मी आईला सांगितलं होतं. मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी घरीच होतो.
बाबा :
पूर्णवेळ घरीच होतास की कुठे बाहेर पण गेला होतास?
मोहित :
अं हो विसरलोच.. मी..
बाबा :
मोहित, एक खोटं बोललं तर ते लपवण्यासाठी आणखी एक बोलावं लागतं 
आणि ही मालिका संपतच नाही.
मोहित :
पण मी..
बाबा :
मोहित तुला माहित्यै, मला खोटं बोलण्याची चीड आहे. आणि
 मुख्य म्हणजे आपण घरात एकमेकांशी खरंच बोलतो किनई?
मोहित :
हो
बाबा :
म.. तू अशी शब्दांची फिरवाफिरवी का करतो आहेस? बोलताना का असा गोंधळला आहेस? तुला जे सांगायचं आहे ते मोकळेपणाने सांग.
मोहित :
क्लास सुटायच्यावेळी मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो..
बाबा :
मित्राला की मैत्रिणीला..? नक्की कुणाला?
मोहित :
अं.. (काहीच बोलत नाही)
बाबा :
माझ्या मित्राने तुला आणि तुझ्या मैत्रिणीला क्लास समोरच्या बंद दुकाना समोर उभं असलेलं पाहिलं. मग त्याने मला लगेच फोन केला आणि म्हणाला,
‘जा आत्ताच्या आत्ता आणि खडसाव त्याला.’
पण मी तसं काही केलं नाही. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मोहित :
अं हो.
बाबा :
म्हणजे? तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस.
मोहित :
अं हो. मला भीती वाटली, तुम्हाला खरं-खरं सांगायला.
बाबा :
पण का? खरं बोललं तर मला राग येत नाही.
आणि खोटं बोललं तर..
मोहित :
(घाबरुन) तर..
बाबा :
असं काय करतोस? तुला माहित आहे, खोटं बोललं तरी मी समोरच्याला 
पुन्हा-पुन्हा खरं बोलालयची संधी देतो. देतो किनई?
मोहित :
हो बाबा.
बाबा :
म.. सांग मला. न घाबरता सांग.
मोहित :
मी परवा क्लासला गेलो नव्हतो. पण क्लास सुटायच्या वेळी मी नेहाला 
भेटायला गेलो होतो. तिच्याकडून मला अभ्यासाची वही घ्यायची होती. 
नेहा आमच्या ग्रुप मधेच आहे.
बाबा :
आणखी काही..
मोहित :
अं.. सांगितल्यावर तुम्ही रागावणार नाही ना..?
बाबा :
मोकळेपणाने बोललास तर मला कळेल ना?
मोहित :
बाबा.. अं.. नेहा मला खूप आवडते. त्यामुळे माझं कधी-कधी अभ्यासात लक्ष 
लागत नाही. मला माहित्यै माझं काहीतरी चुकतंय.
बाबा :
तुला कोण म्हणालं, तुझ काही चुकतंय म्हणून?
मोहित :
म्हणजे..? मला नाही कळलं?
बाबा :
मोहित तू आता नववीत आहेस. या वयात एखाद्या मुलीविषयी आकर्षण वाटणं 
काही गैर नाही. तिच्याशी बोलावंस वाटणं यात ही गैर काही नाही. पण..
मोहित :
पण काय..?
बाबा :
पण त्याचा आपल्या अभ्यासावर परिणाम होणं हे मात्र योग्य नाही.
मोहित :
अं हो..हो. पण मी आता काय करू?
बाबा :
तुला अभ्यास महत्वाचा आहे कि नेहाची मैत्री? तू प्राथमिकता ठरव. 
अभ्यास करताना जर मनात नेहाचे विचार आले तर त्यावेळी मनाला बजाव, 
की ‘आत्ता मला फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायचा आहे. 
 प्लीज इतर गोष्टी नंतर.’
मोहित :
पण असं सांगून होईल?
बाबा :
का नाही होणार? थोड्याशा सरावाने तर होईल पण तुझी तीव्र इच्छा असेल तर लगेच होईल. करुन तर पाहा.
मोहित :
प्रयत्न करतो.
बाबा :
गुड. ‘एखादी गोष्ट नको’ असं म्हंटलं तर ती पुन्हा कराविशी वाटते 
पण ‘तीच गोष्ट मग करुया’ असं म्हंटलं तर, तो विचार बाजूला पडतो.
मोहित :
बाबा आता माझ्या अभ्यासाची तक्रार तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही..
बाबा :
आणि मैत्रीची पण..
मोहित :
हो तर! नक्कीच. बाबा खरंच तुम्ही खूप चांगले आहात.



-    राजीव तांबे
rajcopper91@gmail.com

No comments:

Post a Comment