Sunday, September 18, 2011

शिकवणं : खूप-खूप आणि चांगलं.

शिकवणं : खूप-खूप आणि चांगलं.

परवा एक शिक्षक भेटले. ते म्हणाले, मुलांना खूप चांगलं शिकवायला मला आवडतं. मग थोड्यावेळाने म्हणाले, मला खूप शिकवायला आवडतं.

आता माझा जरा गोंधळ झाला. मी त्यांना या दोनमधला फरक विचारला.

तर ते वैतागून म्हणाले, आता एकदा याबाबत आपण सविस्तरच बोलू. आणि गेले निघून.

नाशिकच्या आनंदनिकेतन शाळेतील मुलांशी गप्पा मारायला गेलो होतो. मुले होती इयत्ता ७वी.

मग हे दोन प्रश्न मुलांनाच विचारले :

१. खूप-खूप शिकवणं म्हणजे काय?

२. चांगलं शिकवणं म्हणजे काय?

मुलांनी भन्नाट उत्तरं दिली. दीपाताईंनी ती पटापट लिहून घेतली. मला आता त्यातली काही आठवत आहेत ती तुमच्या बरोबर शेअर करतो.

१. खूप-खूप शिकवणं म्हणजे : लई बोअर करणं, जाम पकवणं, इतकं शिकवणं-इतकं शिकवणं की नंतर काहीच लक्षात न राहाणं, मुलांना शिक्षा करत शिकवणं, मुलांना समजून न घेता शिकवणं, मुलांची जराशी चूक झाली तरी त्याला भरमसाठ शिक्षा करत पुन्हा तेच शिकवणं.

२. चांगलं शिकवणं म्हणजे : थोडक्यात शिकवणं, शिक्षा न करता शिकवणं, योग्य उत्तर मुलांच्या डोक्यावर न आदळता ते मुलांकडूनच गप्पा मारत काढून घेणं, शिकवताना जोक सांगणं, मुलांना समजलेली गोष्ट पुन्हा-पुन्हा न सांगणं आणि सारखे प्रश्न न विचारता मुलांना पण प्रश्न विचारायला देणं.


तुम्हाला काय वाटतं: खूप खूप शिकवायचं?

चांगलं शिकवायचं?

खूप चांगलं शिकवायचं?

चांगलं खूप शिकवायचं?

पुढच्यावेळी पाहूया, खरंच शिकवता येतं का?

आपण संपर्कात राहूया.

1 comment: